About Founder – रविंद्र तुकाराम कदम

About Founder
रविंद्र तुकाराम कदम
संस्थापक, अर्थसमृद्धी प्रकाशन
🌳 माझी अर्थसमृद्धीची कथा
जीवनात काही घटना अशा घडतात की त्या माणसाला पूर्णपणे बदलून टाकतात. माझ्या आयुष्यातील अशीच पहिली घटना म्हणजे माझा एक वर्षाचा मुलगा अनुराग याचे अकाली निधन.
त्या दुःखातून सावरण्यासाठी आणि त्याच्या स्मृती जपण्यासाठी मला एक झाड लावावे असे वाटत होते. परंतु विचार करताना जाणवले की एक झाड काही मोजक्या लोकांना सावली देईल, पण जर समाजात आर्थिक साक्षरतेचे बीज पेरले तर हजारो कुटुंबांच्या जीवनात समृद्धीची फळे येऊ शकतील.
याच विचारातून "पैशाचं झाड" हे माझे पहिले पुस्तक जन्माला आले. माझ्या मुलाच्या स्मृतींना चिरंतन ठेवण्यासाठी मी "अनुराग प्रकाशन" ची स्थापना केली आणि हे पुस्तक प्रकाशित केले.
त्यानंतर समाजातील लोकांना गुंतवणुकीचे योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने "सोनं-चांदी गुंतवणूक" हे पुस्तक लिहिले. आर्थिक शिक्षणाचा प्रसार करण्याचा माझा प्रवास सुरू झाला.
परंतु नियतीने मला आणखी एक कठीण प्रसंग दिला. माझी मुलगी समृद्धी अंध, अपंग आणि मतीमंद आहे. सुरुवातीला हा मोठा मानसिक धक्का होता. पण हळूहळू तिच्यामुळे माझा परिचय संत तुकाराम महाराजांच्या अभंगांशी झाला. त्यांच्या अभंगांमधील जीवनज्ञान, अध्यात्म आणि अर्थपूर्ण विचारांनी मला नव्या दिशेने विचार करायला शिकवले.
या प्रेरणेतून मी "आनंदवेल" हे पुस्तक लिहिले.
"अर्थेविण पाठांतर कासया करावे । व्यर्थची मरावे घोकूनिया ॥"
— संत तुकाराम महाराज
एक दिवस हा अभंग वाचताना माझ्या मनात एक विचार चमकून गेला — या अभंगातील "अर्थ" हा शब्द आणि माझ्या मुलीचे नाव "समृद्धी" हे दोन शब्द एकत्र आले आणि जन्म झाला —
✨ अर्थसमृद्धी ✨
अशा प्रकारे "अर्थसमृद्धी प्रकाशन" ची स्थापना झाली.
🎯 आमचे ध्येय
आज अर्थसमृद्धी हे फक्त प्रकाशन नाही, तर एक सामाजिक ध्येय आहे. माझा विश्वास आहे की आर्थिक अज्ञानामुळे अनेक कुटुंबे संघर्ष करतात. जर आर्थिक साक्षरता प्रत्येक घरापर्यंत पोहोचली, तर अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनू शकतील.
"पैशाचं झाड लावण्याच्या विचारातून सुरू झालेला प्रवास आज आर्थिक साक्षरतेची वने निर्माण करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला आहे."
🌳 📚 💰 🙏
— रविंद्र तुकाराम कदम, संस्थापक, अर्थसमृद्धी प्रकाशन
माझ्या मुलगा अनुरागच्या स्मृती, मुलगी समृद्धीची प्रेरणा आणि संत तुकाराम महाराजांचे विचार यांच्यापासून जन्मलेली ही चळवळ म्हणजे अर्थसमृद्धी.